www.24taas.com , वृत्तसंस्था, बंगळुरु
बंगळुरु-हैदराबाद महामार्गावर कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागून ४५प्रवाशांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमधील महबूबनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
हैदराबादमधील जब्बार ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची ही एसी व्होल्वो बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती. ही बस पहाटे जुवेर्ला येथून जात असताना बसने रस्ता दुभाजकाला धडक दिली. यात बसची इंधन टाकी फुटली. काही क्षणातच बसला आग लागली. या आगीत ४५प्रवाशांचा होरपळू मृत्यू झाला.
प्रवाशी पहाटे झोपेत असल्याने त्यांना काही कळायच्या आत आगीचा भडका उडाल्याने ते बसमध्येच अडकले. या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. बसमध्ये ४९ प्रवासी होते. मात्र, गाडीचा चालक, क्लिनर आणि अन्य सहा प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर पडले आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथम वनापार्थी येथील सरकारी रुग्णालयात हलविले. त्यानंतर हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी, तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.