दिग्विजय सिंगांनी केलं चक्क मोदींचं कौतुक!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदींवर कायम टीका करणारे काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 29, 2013, 10:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदींवर कायम टीका करणारे काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे. हिंदू -मुस्लीम ऐक्याची शेवटी मोदींना जाणीव झाली ही चांगली बाब असल्याचे दिग्विजय सिंग यांनी म्हटलं.
दिग्विजय म्हणाले, ` पाटणा येथील हुंकार रॅलीत नरेंद्र मोदींचे ह्रदयपरिवर्तन झाले त्याचे स्वागतच करायला हवे. भाजप आणि मोदींना शेवटी हिंदू-मुस्लीम एकतेची गरज असल्याचे समजल्याचे दिग्विजय सिंग यांनी स्पष्ट केले. मोदींना खरंच हिंदू-मुस्लीम भाई-भाई हे चित्र पाहायचे असेल तर त्यांनी आधी २००२ च्या गुजरात दंगलीतील पिडीतांचे पुनर्वसन करावे आणि विहिंपच्या नेत्यांना प्रक्षोभक विधान करण्यापासून थांबवायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदींनी हुंकार रॅलीत हिंदू-मुस्लीमांनी गरिबीविरोधात लढा देण्यासाठी एकत्र यावे असे सांगत हिंदू-मुस्लीम भाई-भाई असा नारा दिला होता.
मंगळवारी दिग्विजय सिंगानी ट्विटरवरुन मोदींचे उपहासात्मक शैलीत पुन्हा एकदा कौतुक केले आहे. `संघाच्या विचारसरणीला विरोध करणारे लोहपुरुष सरदार पटेल यांचा पुतळा उभारणा-या मोदींचे अभिनंदन` असे ट्विट त्यांनी केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.