www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आधार क्रमांकासाठी आतापर्यंत ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
आधार क्रमांकधारक लाभार्थींची ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांकाशी संबंधित तीन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यूआयडीआयचे अध्यक्ष नंदन निलेकणी, सचिव सिंधुश्री खुल्लर, यूआयडीआयएचे महासंचालक विजय एस. मदान यांच्या उपस्थितीत नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनी या सेवांचे उद्घाटन केले. सरकारच्या अंशदान योजनांचा लाभ घेणाऱ्यांची माहिती मिळण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
डोळ्यांतील बुबुळ, नोंदणीकृत मोबाइलवर मिळालेला वन टाइम पिन (ओटीपी) आणि इलेक्ट्रॉ निक केवायसी, या आधारे लाभार्थींची माहिती पडताळून पाहिली जाईल. आधार क्रमांकाची नोंदणी करतेवेळी बुबुळाच्या घेण्यात आलेल्या छायाचित्राची स्कॅनरद्वारे पडताळणी केली जाईल.
आधार क्रमांकधारकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर येणाऱ्या ओटीपीद्वारे त्याच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी होईल. याशिवाय आधार क्रमांकधारकांना ई-केवायसीमार्फत बायोमेट्रिक आणि लोकसंख्येसंदर्भातील आकडेवारीच्या इलेक्ट्रॉनिक प्रती मिळविता येतील. पत्ता बदल किंवा छायाचित्र बदल, यासाठी आधार क्रमांकधारकांना कायमस्वरूपी नोंदणी केंद्रांमध्ये जाऊन बदल करता येईल.
मजुरी, सार्वजनिक वितरण व्यवस्था, सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत येणारी वृद्धावस्था पेन्शन योजना, एलपीजी अनुदान यांसारख्या योजनांचे अंशदान लाभार्थींच्या थेट खात्यात जमा करण्यासाठी आधार क्रमांक बॅंक खात्याशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर आधारकार्ड सोबत नसले, तरी बुबुळांच्या आधारे क्रमांकधारकाची ओळख पटविली जाईल. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या मदतीनेही ओळख पटविली जाईल. त्यासाठी संबंधित व्यक्तीने एसएमएसद्वारे ओटीपी मागविणे आवश्याक असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.