www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीतील निवडणुकीनंतरचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेचा तिढा सुटणार की नाही, असेच दिसून येत आहे. काँग्रेसने आधी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पाठिंब्याचे पत्र नायब राज्यपालांना दिले होते. परंतु आम्हाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही असे सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने देऊ केलेला बिनशर्थ पाठिंबा धुडकावला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
दरम्यान, दुसरीकडे अरविंद केंजरीवाल आज उपराज्यपालांना भेटणार आहेत. त्यानंतर महत्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीने सत्ता स्थापन करण्याबाबतचे संकेत दिले होते. याबाबत कुमार विश्वास यांनी सूचक संकेत दिले होते. आम्ही विचार करतोय. आमची बैठक होईल त्या बैठकीत नक्की काय करायचे ते ठरेल, असे कुमार विश्वास यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे दिल्लीतील सत्तेचा तिढा सुटण्याची आशा होती. मात्र, पीटीआयच्या वृत्तानंतर सत्तेचे स्वप्नच अधुरं राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
दिल्लीमध्ये काल सायंकाळपासून केजरीवाल यांची आम आदमी पार्टी सत्ता स्थापन करणार का या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरु होती. भाजपनं सत्तास्थापनेचा पर्याय नाकारल्यानंतर दिल्लीच्या नायब राज्यपालांनी आम आदमी पार्टीला आमंत्रण दिलं आहे. आज सकाळी साडेदहा वाजता केजरीवाल उपराज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टी हा सत्तेचा राजकीय डाव खेळायला तयार होईल, अशी शक्यता होती. परंतु तसे काही होणार नाही. हेच सध्या दिसून येत आहे. काँग्रेसचा पाठिंबा घेण्यास केजरीवाल यांच्या पार्टीने नकार दिल्याचे पीटीआयने म्हटलेय.
दिल्लीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही बहुमताचा आकडा नसल्यानं त्यांनी पक्ष स्थापण्यास नकार दिला. भाजपकडे ३२ तर आम आदमी पक्षाकडे २८ जागा आहेत. काँग्रेसच्या ८ आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आप बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६चा आकडा पार करु शकते. तसेच दोन अपक्ष आमदार निवडून आले आहेत. केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वीच आपण कुणाचाही पाठिंबा घेणार नाही अथवा कुणाला पाठिंबा देणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे पीटीआयचे वृत्तानुसार दिल्लीत कोणाचेही सरकार येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.