नवी दिल्ली : आपच्या नेत्यांनी दिल्लीत दिवे लावायला सुरूवात केली आहे. कारण आपच्या एका आमदाराला पोलिसांनी आज फरारी घोषित केले आहे, आमदार जर्नेलसिंग यांच्यावर सरकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आमदार जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
जर्नेलसिंग पश्चिम दिल्लीमधील टिळकनगरमधून निवडून आले आहेत. ते ४२ वर्षांचे आहेत, दिल्लीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या अजहर मुस्तफा या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या समूहाचे नेतृत्व जर्नेलसिंग यांनी केले होते. त्यानंतर मुस्तफा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
कारवाई होणारी बांधकामे अनधिकृत असल्याची कागदपत्रे दाखवली, तेव्हा जर्नेलसिंग यांनी ती कागदपत्रे फाडली, असा आरोपही मुस्तफा यांनी केला होता. मात्र, ‘त्या बांधकामाच्या मालकाला कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती,‘ असा दावा जर्नेलसिंग यांनी केला होता. जर्नेलसिंग यांनी त्या अभियंत्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. सध्या जर्नेलसिंग फरारी असून ते लवकरच शरणागती पत्करतील, अशी अपेक्षा दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.