मुझफ्फरपूर : कोणतीही परीक्षा घेतना भिती असते ती कॉपी होण्याची. मात्र, यावर भलताच उपाय शोधून काढला तो बिहारमध्ये. लष्कर भरतीची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना चक्क अंडरवेअरवरच बसविण्यात आले. त्यामुळे या धक्कादायक प्रकाराचा निषेध केला जात आहे.
लष्कर, पोलीस भरती परीक्षेदरम्यान अनेकवेळा उमेदवारांना हाफ पँटमध्येमध्ये धावताना पाहतो. मात्र बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये लष्कराच्या परीक्षेदरम्यान उमेदवार केवळ अंतर्वस्त्र घालून परीक्षा देत होते. परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये यासाठी लष्करातर्फेच हा धक्कादायक आदेश देण्यात आलाय.
रविवारी मुझफ्फरपूरमध्ये लष्करात क्लार्क भरती करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. सुमारे ११५० उमेदवार या परीक्षेसाठी बसले होते. मात्र परीक्षा केंद्रावर सर्व उमदेवारांना अंतर्वस्त्र वगळता अंगावरील सर्व कपडे काढून घेण्यात आले. त्यानंतर उमेदवारांना परीक्षेला खुल्या मैदानातच बसविण्यात आले.
या प्रकारामुळे परीक्षेच्या तणावात असलेल्या सर्व उमेदवारांना या आदेशामुळे धक्काच बसला. गेल्या वेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक उमदेवार कॉपी करताना आढळले होते. त्यामुळे ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा उपाय केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.
या आदेशामुळे सर्व उमदेवारांना खुल्या मैदानात अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर बसून उत्तरपत्रिका लिहावी लागली. अनेकांना उत्तर लिहीताना बरीच कसरत करावी लागली. बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली नव्हती.