www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी देण्यात येणार असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतच चर्चा केली. २०१४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत त्यांनी माझ्याकडून जाणून घेतले, अशी माहिती चव्हाण यांनी लोकमशी बोलताना दिली. तीन वर्षांपूर्वी आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद गेले. तेव्हापासून मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिल्ली दरबारी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नांदेडच्या महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी चांगले यश मिळविले आहे. २०१४च्या निवडणुका गृहित धरता त्यांचा राज्यात वापर करून घेण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले.
मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. ते म्हणाले, मी कॉँग्रेसचा कार्यकर्ता आहे. दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन. कोणत्याही पदासाठी माझा अट्टाहास नाही..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.