नेहरुंना हार घातल्यानं 'ती' राहिली आजन्म अविवाहीत!

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे... त्याचनिमित्तानं नेहरुंबद्दलची ही एक अशीही आठवण... 

Updated: Nov 14, 2014, 02:55 PM IST
नेहरुंना हार घातल्यानं 'ती' राहिली आजन्म अविवाहीत! title=

रांची : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे... त्याचनिमित्तानं नेहरुंबद्दलची ही एक अशीही आठवण... 

६ डिसेंबर १९५९.... झारखंडच्या धनबाद जिल्हास्थित पंचेत डॅमचं उद्घाटन करण्यासाठी पंडित नेहरु दाखल दाखल झाले होते... पंडित नेहरुंचं स्वागत करण्यासाठी १५ वर्षांच्या एका आदिवासी मुलीला आणि एका मुलाला बोलावण्यात आलं होतं... या मुलीनं पंडित नेहरुंचं स्वागत मोठ्या खुशीत हार घालून केलं... पण, या एका क्षणाची किंमत तिला आयुष्यभर चुकवावी लागलीय. 


बुधनी आणि नेहरु

या मुलीचं नाव आहे बुधनी देवी... पंडित नेहरु पंचेत डॅमचं उद्घाटन करायला गेले तेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांनी १५ वर्षांच्या बुधनी मंझियाइन हिला नेहरुंचं स्वागत करण्यासाठी आणलं... तेव्हाही ती मजूर म्हणून काम करत होती. बुधनीसोबत रावन मांझी नावाच्या एका तरुणालाही बोलावण्यात आलं होतं. यावेळी, दोघांनीही पंडित नेहरुंचं स्वागत केलं... बुधनीनं पंडित नेहरुंना हार घातला... कपाळावर टिळाही लावला... त्यानंतर बुधनीच्याच हातांनी या डॅमचं उद्घाटन करण्यात आलं.  

पण, हाच दिवस तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि तितकाच त्रासदायक ठरला... कारण, जेव्हा बुधनी आपल्या गावात परतली तेव्हा तिच्यासाठी गावचे दरवाजे बंद झाले होते... संथाल या बुधनीच्या आदिवासी समाजानं तिच्यावर बहिष्कार टाकला होता.... ‘बुधनीनं नेहरुंना हार घातला याचा अर्थ तिनं त्यांच्याशी लग्न केलंय’ असं त्यांचं म्हणणं होतं.

त्यामुळे, नेहरुंची पत्नी असलेल्या बुधनीसोबत कोणत्याही संथाल तरुणानं लग्न करू नये, असं फर्मानचं समाजाच्या पंचायतीनं काढलं. शिवाय, नेहरु संथाल नव्हते... त्यामुळे इतर समाजाच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा ठपका ठेवत तिच्यावर संपूर्ण गावानं बहिष्कार टाकला. यामध्ये, बुधनीचे कुटुंबीयही काही करू शकले नाहीत... त्यांनीही तिची साथ सोडली. 

परंतु, पंचेतमध्ये राहणाऱ्या सुधीर दत्ता यांनी यावेळी बुधनीला साथ दिली... पण, लग्न करण्याचं धाडस मात्र दाखवलं नाही. दोघंही लग्नाशिवाय पती-पत्नीप्रमाणे राहत होते... त्यांना एक मुलगीही झाली.

बुधनी सध्या पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील एका गावात राहतेय. ती आज जवळपास ७० वर्षांची आहे... सध्या ती भ्रमित अवस्थेत आपलं जीवन जगतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.