नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा हा निर्णय असल्याचं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी केवळ स्थगितीवर समाधान न मानता कुलभूषण जाधवांना परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. शेवटचा निकाल येईपर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. कोर्टने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कुलभूषण जाधवला गुप्तहेर नाही म्हणता येणार. न्यायाधीश रोनी अब्राहम यांनी निकाल देतांना म्हटलं की, जाधव हे गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा दावा मान्य नाही करता येणार. व्हियन्ना करारानुसार भारताला कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. अब्राहम यांनी म्हटलं की, जाधव यांना केलेली अटक हा वादाचा विषय आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती असली पाहिजे. पाकिस्तानने असा कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ज्यामुळे बदल्याची भावना निर्माण होईल.