www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय असलेली मोदींची दिल्लीतील हायटेक सभा आज उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात जापानी पार्क इथं होणार आहे. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. सभेच्या ठिकाणी मोदींचं १०० फूटी कटआऊट उभारण्यात आलंय. लाखो भाजप कार्यकर्त्यांसह ३५ देशांचे राजदूतही या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीवर स्वारी करण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सज्ज झालेत. आधी लाल किल्ला, नंतर संसद भवन आणि आता कमळाच्या पाकळ्या. मोदींच्या भाषणासाठी व्यासपीठ सजलंय... जापानी पार्क इथं होणाऱ्या हायटेक सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. या सभेसाठी स्थानिक भाजप नेत्यांनी जवळपास ९ कोटींचा खर्च केल्याचं कळतंय. शिवाय सभेसाठी प्रचंड गाजावाजाही केला आहे. यासाठी दोन लाखांची गर्दी जमविण्याचाही त्यांनी चंग बांधला आहे.
अडीच लाख लोकांसाठी साडेचार लाख चौरस फूटाचा शामियाना उभारण्यात आलाय. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोदींचा चेहरा स्पष्टपणे दिसावा आणि आवाज ऐकू यावा यासाठी २ भले मोठे स्क्रीन लावण्यात आलेत. संपूर्ण शहरात १५ जागी टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून मोदींच्या सभेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
सभेच्या ठिकाणी मोदींचं १०० फूटी कटआऊट उभारण्यात आलंय. लाखो भाजप कार्यकर्त्यांसह ३५ देशांचे राजदूतही या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनचे राजदूत सभेत सामील होणार नाहीत. ‘बदलेंगे दिल्ली, बदलेंगे भारत’ असा भाजपनं सभेचा नारा दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.