www.24taas.com, नवी दिल्ली
पक्षानं धाडलेल्या कारणे दाखवा नोटीशीला भाजपचे निलंबित खासदार राम जेठमलानी यांनी केराची टोपली दाखवलीय. वकिलीच्या आपल्या कामात आपण खूप व्यस्त आहोत आणि असल्याची फुटकळ नोटीशींना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, असं म्हणत भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिलंय.
भाजपा अध्यक्ष नितीन गडकरींवर सातत्यानं टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणा-या खासदार राम जेठमलानींची पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आलीय. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जेठमलानी यांना भाजपनं धाडलेल्या नोटिशीला उत्तर देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना जेठमलानी म्हणाले ‘भाजपची कोणतीही नोटीस मला मिळालेली नाही. या नोटीशीबद्दल मी मीडियाकडूनच ऐकतोय. माझ्याकडे न पोहचलेल्या त्या महान दस्तावेजाला मी अद्याप वाचलेलं नाही, जेव्हा माझ्याकडे ही नोटीस येईल आणि मी त्याला वाचल्यनंतरच मी आपल्याला सांगू शकतो की त्यावर मी काय भूमिका घेईन. मी माझ्या वकिलीच्या कामात सध्या खूप व्यस्त आहे आणि दहा दिवसांच्या आत असल्या नोटीशींना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीए’असं म्हटलंय.
राम जेठमलानींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाचं नुकसान झालं असून, पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाल्याचं पक्षाचे प्रवक्ते शहानवाज हुसैन यांनी म्हटलंय. आपल्याला काढून टाकण्याची हिंमत कोणातच नाही, अशा शब्दांत राम जेठमलानींनी पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं.