www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांची घालमेल इतकी वाढली होती की रात्री उशीरा त्यांनी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी पटेल यांच्याशी जवळपास 40 मिनिटं चर्चा केली. ही बैठक पटेल यांच्या घरीच पार पडली. आज पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार असल्याचं समजतंय. दरम्यान काँग्रेस नेते ए.के. अँटोनी आणि गुलाब नबी आझाद सोमवारी मुंबईत येण्याची शक्यता असून काँग्रेस विधीमंडळाची बैठक सोमवारी होण्याची शक्यता आहे.
येत्या सोमवारी दिल्लीमध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी आणि गुलाम नबी आझाद हे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रथम पुण्यामध्ये सूचक वक्तव्य केलं.
‘हायकमांडला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मात्र मला अजून काही सांगितलेलं नाही. तोपर्यंत मी काम करत राहणार’ अशी प्रतिक्रिया चव्हाणांनी पुण्यात व्यक्त केली. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र याबाबत मौन बाळगणंच पसंत केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.