नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम इथं तुफानी बर्फवृष्टी झालीय.
यंदा तब्बल एक महिना आधीच बर्फ पडून केदारनाथची पर्वतशिखरं हिमाच्छादित झालेली दिसतायत. त्यामुळे चारधाम यात्रेतल्या भाविकांना केदारनाथाच्या बर्फावताराचा सुखद अनुभव घेता आला. त्याच वेळी लवकर झालेल्या या हिमवर्षावानं कडाक्याच्या थंडीची चाहुलही दिलीय.
साधारणतः नोव्हेंबर महिना उजाडला की उत्तराखंडला बर्फवृष्टीची चाहूल लागते. मात्र यंदा महिनाभर आधीच बर्फ पडायला सुरूवात झालीय. बर्फवृष्टी म्हणजे थंडीची चाहूल, हे अनेक वर्षांचं समीकरण असल्यानं चार धामचे दरवाजे बंद होण्याच्या तारखाही जाहीर झाल्यात. उत्तर काशीमधल्या जमुनोत्रीचे दरवाजे १ नोव्हेंबरला भाऊबीजेच्या मुहूर्तावर दुपारी पाऊणेतीनला बंद होतील.
दिल्लीतही दसऱ्यानंतर रात्री आणि दिवसाच्या वातावरणात बदल दिसायला सुरुवात झालीय. पहाटे आणि रात्री घरातील एसी आणि कूलर बंद होताना दिसत आहेत. दुपारी मात्र गरम हवा सुरूच असते.