www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे. या विधेयकामध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरूस्त झाल्यानंतर पाठिंबा देऊ असं खा. राऊत म्हणाले आहेत.
गेली ५ वर्षं युपीए शासन असताना काँग्रेसने जनतेसाठी काही केलं नाही. मात्र निवडणूक जवळ येताच अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करून घेणं, हा गरीबांविषयीचा कळवळा नसून राजकीय डाव आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
अन्न सुरक्षा कायद्याचा अध्यादेशावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज या कायद्याच्या अध्यादेशावर मतदान घेण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कायद्यावर युक्तीवाद केला.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी अन्न सुरक्षा कायद्याचा अध्यादेश कोणत्याही किमतीवर काढण्यात य़ेणार असून लवकरच विधेयकही पारित करण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर अन्न सुरक्षा कायद्याला भाजपचा पाठिंबा आहे. मात्र सरकारनं विधेयक आणून चर्चा कऱण्याची मागणी भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी केली.
सरकार केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यादेश काढत असल्याची टीका त्यांनी केली. तर या कायद्यामुळं शेतकऱ्यांची अडचण होणार असून त्यांच्या मालाच्या हमीभावाबाबत कायद्यात उल्लेख नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.