चारित्रहिन बापाची मुलानंच दिली होती सुपारी...

बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भारद्वाज यांचा छोटा मुलगा नितेश याला अटक केलीय. संपूर्ण रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर अखेर नितेशनं आपला गुन्हा कबूल केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 12, 2013, 01:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरबपती व्यावसायिक आणि बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भारद्वाज यांचा छोटा मुलगा नितेश याला अटक केलीय. संपूर्ण रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर अखेर नितेशनं आपला गुन्हा कबूल केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
विशेष म्हणजे, या बाप-लेकाची एकच गर्लफ्रेंड असल्याचेही स्पष्ट झाले आणि याच कारणावरून मुलाने आपल्या बापाचा काटा काढला होता. दुसरीकडे, दीपक भारद्वाज हे आपल्या घरीच दररोज वेगवेगळ्या तरुणी घेऊन येत असल्याने भारद्वाज आणि त्यांच्या पत्नीत नेहमी वाद असत. तरुणींसमोरच ते त्यांच्या पत्नीला मारहाण करत होते. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्यात वाद होण्यामागे भारद्वाज यांचे वकील बलजीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. बलजीत हेच दोघांत कशा प्रकारे वाद होतील, याच्यासाठी प्रयत्न करीत असत. त्यामुळे आता बलजीत सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस सूत्रांनुसार, वकील बलजीत सिंग हे या प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत.
आज कोणत्याही क्षणी नितेश भारद्वाज याला कोर्टात हजर करण्यात येईल, अशी माहिती मिळतेय. या प्रकरणात एका वकिलालाही ताब्यात घेण्यात आलंय. हा वकील प्रॉपर्टीची कामं करतो. या प्रकरणात भारद्वाज यांच्या पत्नीचीही काही भूमिका होती का याचा पोलीस तपास करत आहेत.
आपल्या पित्याच्या वागणुकीवर तसंच मालमत्ता वाटपासंदर्भात नितेश भलताच संतापलेला होता. दीपक भारद्वाज यांच्याबद्दलचा संताप इतका होता की पोलिसांसमोरही तो नियंत्रणात ठेवणं नितेशला अवघड गेलं. आपणच आपल्या वडिलांच्या हत्येसाठी सहा करोड रुपयांची सुपारी दिली होती, असं नितेशनं पोलिसांसमोर कबूल केलंय.

... अशी झाली हत्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेशनं ही सुपारी त्याचे परिचित वकील बलजीत सिंह सहरावत याला दिली होती. सहरावत याची ओळख स्वामी प्रतिमानंद याच्यासोबत होती. या सुपारीसाठी त्यानं सहारावतला दोन करोड देण्याचं कबूल केलं. स्वामीही तयार झाला. त्यानं दिल्ली बाहेरच्या अनेक गुन्ह्यांत हात असलेल्या पुरुषोत्तम ऊर्फ मोनू याच्याशी संपर्क केला. स्वामीनं मोनूला एक करोड रुपयांची ऑफर दिली.
मोनूही तयार झाला. त्यानं आपला मित्र सुनील मान याच्याशी संपर्क केला. मोनूनं सुनीलला या कामासाठी आपल्याला केवळ ३० लाख रुपये मिळणार असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक भारद्वाज यांच्या हत्येचा कट मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातच बनवण्यात आला होता.