www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंधरा वर्षांपूर्वी कांद्यामुळं भाजपची दिल्लीतली सत्ता गेली. आता काँग्रेसलाही त्या समस्येला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं खडबडून जागं झालेल्या दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.
कांद्याने शंभरी गाठल्याने दिल्लीतल्या सत्ताधा-यांची चांगलीच धावपळ झालीय. कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी दिल्लीश्वर थेट नाशिकमध्ये येवून ध़डकले आहेत. नाशिकहून दिल्लीला कमी खर्चात कांदा नेता येईल का याची चाचपणी दिल्लीच्या कृषी सचिवांनी केली. यावेळी त्यांनी वेफ्कोचे आणि नाफेडच्या पदाधिका-यांशी भेट घेऊन चर्चा केली.
दिल्लीला रोज ४०० टन कांदा लागतो. त्यामुळं ज्या संस्था कमी दरात कांदा उपलब्ध करून देतील अशा संस्था आणि व्यापा-यांकडून कांदा खरेदी केला जाणार आहे. नाशिक जिल्हातल्या लासलगाव आणि पिंपळगाव या मुख्य बाजार समितींमधून येत्या सोमवारपासून वेफको किंवा व्यापा-यांकडून कमी दराने रोज ४०० टन कांदा दिल्लीला पाठविला जाणार आहे.
सध्या उन्हाळ्यामुळे कांद्याची आवक संपुष्टात आलीयं. तर लाल कांद्याचीही आवक घटलीय. त्यातच आता दिल्लीला रोज ४०० टन कांदा लागणार आहे. आधीच कांद्याचा तुटवडा असताना एवढा कांदा कसा उपलब्ध होणार हा खरा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.