जेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...

डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.

Updated: Jul 28, 2015, 03:49 PM IST
जेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात... title=

नवी दिल्ली : डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.

श्रीजन पाल सिंग लिहितात, "आम्ही सहा ते सात गाड्यांच्या ताफ्यासह निघालो होतो, डॉ. कलाम आणि मी दोन नंबरच्या गाडीत होतो. आमच्या पुढे एक ओपन जिप्सी कार होती, त्यात तीन जवान होते, त्यातील दोन बसलेले होते, तर एक जवान समोरच्या दिशेने रायफल ताणून वरच्या बाजूला उभा होता."

"हा आमचा प्रवास तासाभराचा असेल, तेव्हा डॉ. कलाम मला म्हणाले, हा जवान केव्हापासून का उभा आहे, तो थकला असेल, ही त्याला शिक्षा दिल्यासारखं वाटतंय, तुम्ही वायरलेसला संदेश पाठवा, आणि त्या जवानाला बसायला सांगा."

मी डॉ. कलाम यांना समजावलं की, चांगली सुरक्षा देण्यात यावी यासाठी या गार्डला उभं केलं आहे, तशा त्याला सूचना दिल्या असाव्यात, मात्र माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचं समाधान झालं नाही, ते पुन्हा-पुन्हा त्याला खुणावण्याचा प्रयत्न करत होते, खाली बसण्याचे हातवारे करत होते. त्यांनी रेडिओ मेसेज देण्याचाही प्रयत्न केला, पण तो जवानापर्यंत पोहोचला नाही.

माझा हात धरून कलाम म्हणाले, "शेवटी, आपण एवढं तरी करू शकतो, मी त्याला भेटेन आणि त्याला थँक्स म्हणणार, जेव्हा आपण आयआयएम शिलाँगला पोहोचू ". 

मी सिक्युरिटी फोर्सच्या लोकांना सांगून त्या जवानाला थांबवलं. मी त्याला डॉ. कलामांकडे घेऊन गेलो, डॉ.कलामांनी त्या जवानाच्या हातात हात घेतला, हात हलवून हस्तांदोलन केलं, आणि म्हणाले, "धन्यवाद मित्रा."

डॉ. कलाम पुन्हा म्हणाले, 'तू थकलायस का?, तू काही खाशील का?, सॉरी माझ्यामुळे तुला बराच वेळ उभं रहावं लागलं.'

डॉ. कलामांचं हे वाक्य ऐकून काळ्या कपड्यातला सळपातळ उंच जवानाला आश्चर्य वाटलं, काय बोलावं त्याला कळतं नव्हतं, तो म्हणाला, "सर, आपके लिए छह घंटे भी खडे रहेंगे".

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.