अहमदाबाद : गुजरातमधील वडोदरा येथे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पती रंगाने काळा असल्याने एका मुलाच्या आईने पतीला संपवून टाकले.
नवरा रंगाना काळा आहे म्हणून त्याच्या डोक्यात हातोडा घालून त्याला शांत डोक्यानं संपवण्याची घटना वडोदरा जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
२२ वर्षांच्या तरुणीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, आपला नवरा रंगाने काळा असल्याने तिला पसंत नव्हता. मात्र, घरच्यांच्या दबावामुळं तिने लग्न केले. लग्नानंतर सुरुवातीला ती माहेरीच असायची. मात्र एकेदिवशी सासू-सासऱ्यांनी तिला बोलावून घेतले. तेव्हापासून नाईलाजानेच ती सासरी राहत होती. दहा दिवसांपूर्वी तिनं एका बाळाला जन्मही दिला होता.
असे असताना तिच्या मनात पतीबद्दल अढी कायमच होती. अशातच बुधवारी रात्री पतीने तिला शेतावर यायला सांगितले. शारीरिक संबंध ठेवण्यासाठीच तो आपल्याला शेतावर बोलावतोय, असा संशय तिला आला. त्यामुळे ती थेट हातोडा घेऊनच गेली. तिचा संशय खरा ठरला. तिने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले.
वादानंतर ती तिथेन निघून गेली. मात्र काही वेळातच ती परत आली आणि बेसावध पतीच्या डोक्यावर हातोडाच घातला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पसरली.
पेटलाड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी करता पोलिसांना तिच्याबद्दल संशय आला. सुरुवातीला तिनं काहीही बोलण्यास नकार दिला, पण पोलिसांनी लाय-डिटेक्टर चाचणी घेण्याचा इशारा देताच पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.