नवी दिल्ली : न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील १० प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत गुगलने टाकलं आहे , म्हणून गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले..
गुगलवर जगातील १० प्रमुख गुन्हेगार असं सर्च केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही दाखवला जात आहे, अशी तक्रार वकील सुशील कुमार मिश्रा यांनी न्यायलयात केली. 'मी याप्रकरणी गुगलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच उत्तर मिळालं नाही. मी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती', असं सुशील कुमार मिश्रा यांनी म्हटलंय.
सुशील कुमार मिश्रा यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात आव्हान देत पुनरावृत्ती अर्ज केला ज्यानंतर त्याची याचिका स्वीकारण्यात आली. 31 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
यापूर्वी सुशील कुमार मिश्रा यांना कोणाकडूनच दाद मिळाली नाही, तेव्हा त्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. हे सिव्हिल प्रकरण असल्याचे सांगत त्यांची याचिका सुरूवातीला फेटाळून लावण्यात आली होती.