नवी दिल्ली : वर्ल्ड टी-20 सामन्यासाठी पाकिस्तान संघाला भारतात बोलावणे, ही केंद्र सरकारची मोठी चूक आहे, असं धक्कादायक वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.
'मी उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत आहे. त्यांना येथे परवानगी देणे चूक आहे. आपण श्रीलंका, ढाका, मालदीव किंवा इतर ठिकाणी हे सामने घेऊ शकलो असतो. पण भारतात ज्यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघ येतो, त्यावेळी त्यांच्यामागे प्रेक्षकांच्या नावाखाली आयएसआयचे लोक येतात', असं स्वामी म्हणाले.
तसेच 'मला वाटते दहशतवादाच्या मुद्याचे निराकरण झाल्याशिवाय पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळू नये, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करावा', असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने, भारतात कधीच असुरक्षित वाटत नसल्याची भावना व्यक्त केली आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला विरोध दर्शविला आहे. सुरक्षाविषयक परवानगी मिळाल्यानंतर पाकिस्तानी संघ शुक्रवारी रात्री भारतात दाखल झाला.