www.24taas.com, नवी दिल्ली
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतातील संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यातील शहिदांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, अफजल गुरूला कधी फाशी देणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
संसदेवर अकरा वर्षांपूर्वी १३ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता दहशतवादी हल्ला झाला होता. कारने आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार चकमक झाली होती. यात पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले तर ९ सुरक्षा रक्षक शहीद झाले होते.
दरम्यान, संसदेत शहिदांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली तरीही शहिदांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांना काही वर्षांपूर्वीच सरकारकडून मिळालेले मेडल्स परत केली आहेत. अफजलला फाशी दिल्यानंतरच ही मेडल्स आम्ही परत घेऊ अन्यथा ही मेडल्स संग्रालयात ठेवा, असा पवित्रा शहिदांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.