पाटणा : बिहारमध्ये राजकीय पेच वाढत असल्याचं चित्र आहे. नितीश कुमार यांच्यासाठी सिंहासन रिकामं करण्यास मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नकार दिलाय. २० तारखेला मांझी यांनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे.
पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी ७ तारखेला बोलावलेली बैठक अनधिकृत असल्याचं मांझी यांनी म्हटलंय, अशी बैठक बोलावण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना असल्याचा दावा त्यांनी केलाय.
दुसरीकडे नितीश कुमारांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावलीये. जेडीयूमध्ये घडणा-या घडामोडींवर भाजपनं मांझी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय.
मांझी यांना हटवल्यास बिहार सरकार दलितविरोधी असल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल, असं भाजपनं म्हटलंय. तर एकेकाळचे नितीश कुमारांचे हाडवैरी लालूप्रसाद यादव मात्र त्यांच्या मदतीसाठी धावून येण्याच्या तयारीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.