नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यात चर्चा झाली. यावेळी काश्मीरच्या मुद्यावरुन मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती 50 दिवसांनंतरही कायम आहे. दहशतवादी बुरहान वाणीला कंठस्नान घातल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु झालाय. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही हिंसाचार काही कमी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.
काश्मीरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावं अशी मागणी काँग्रेस आणि डाव्यांनी केलीय. या मागणीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.. या बैठकीच्या निमित्ताने मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानवर निशाणा साधलाय..
दुसरीकडे पाकिस्ताननं पुन्हा एकदा चर्चेची री ओढली आहे. बासित यांच्या चर्चेच्या विधानावरही मेहबूबा मुफ्ती यांनी जोरदार तोंडसुख घेतले. जे लष्कराच्या छावण्यांना घेराव घालून हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी चर्चा कशी करणार, असा सवाल मेहबूबा मुफ्ती यांनी उपस्थित केला आहे.