केजरीवालांनी उघड केले अंबानी बंधूंचे अकाउंट नंबर्स

अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी या पक्षाच्या स्थापनेपूर्वीच अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ माजवली होती. यावेळी मुख्यत्वे केजरीवालांचा रोख होता तो अंबानी बंधूंवरच. मात्र आता त्यांनी अंबानी बंधूंचे बँक अकाउंट नंबरही जनतेसमोर उघडे केले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 10, 2012, 05:58 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी या पक्षाच्या स्थापनेपूर्वीच अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ माजवली होती. याच बरोबर राजकीय नेत्यांसोबतच उद्योगपतींच्या असलेल्या साट्यालोट्याचीही त्यांनी अनेकदा पोल खोल केली. यावेळी मुख्यत्वे केजरीवालांचा रोख होता तो अंबानी बंधूंवरच. मात्र आता त्यांनी अंबानी बंधूंचे बँक अकाउंट नंबरही जनतेसमोर उघडे केले आहेत.
भारत सरकार हे अंबानी बंधूंचं दुकान असल्याचा आरोप केजरीवाल यांनी यापूर्वी केला होता. अंबानी बंधूच अप्रत्यक्षपणे देश चालवत असल्याचंही केजरीवालांनी म्हटलं होतं. अंबानी बंधूंचा अकाउंट नंबरही आपल्याकडे असून गरज पडल्यास आपण ते लोकांसमोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला होता. अंबानींच्या स्वीस बँकेतील अकाउंटचा नंबर जरी केजरीवालांनी सांगितला नसला, तरी एचएसबीसी बँकेच्या जिनेव्हा शाखेमधील 5090160983 आणि 5090160984 ही दोन खाती अंबानी बंधूंची असल्याचा गौप्यस्फोट केजरीवालांनी केला आहे.
या अकाउंट्समध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानींचे प्रत्येकी १०० कोटी रुपये आहेत. तसंच मोटेक सॉफ्टवेअर प्रा. लि.च्या नावाने २१०० कोटी रुपये तर रिलायन्सच्या नावाने २५ कोटी रुपये जमा केले गेले होते, असं केजरीवाल म्हणाले. स्वीस बँकेमध्ये ७०० भारतीयांनी ६,००० कोटी रुपये जमा केल्याचं केजरीवाल म्हणाले होते.
केजरीवालांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल अंबानींचे एचएसबीसी जिनेव्हामध्ये कुठलंही अकाउंट नसल्याचं अंबानींच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. केजरीवाल हे प्रसिद्धीसाठी अंबानी बंधूंवर आरोप करत असल्याचं प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. मुकेश अंबानींनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.