मुंबई : "प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तुमच्यासारख्या लाखो पोलिसांना आणि देशाची सेवा करणाऱ्यांना मी सलाम करतो" अशा आशयाचा मॅसेज काल देशभरातील १८ लाख पोलिस आणि निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा मॅसेज आला होता दस्तुरखुद्द पंतप्रधानांकडून.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सुरक्षा यंत्रणेतील १८ लाख कर्मचाऱ्यांना हा मॅसेज पाठवला. हा संदेश 'DZ-PMModi'या बल्क एसएमएस तंत्रावरून आला होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांपासून ते अगदी शिपाई म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाला मॅसेज आला.
देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असा मॅसेज खुद्द पंतप्रधानांकडून सर्वांना आला असेल. गेल्यावर्षी गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात डीआयजींच्या तीन दिवसीय अधिवेशनादरम्यान मोदींनी प्रत्येक पोलिसाला वैयक्तिकपणे शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
यानंतर त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला आपल्या दलातील व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांची यादी पाठवण्यास सांगितले होते. त्यांनी पाठवलेल्या यादीच्या आधारावरच हे मॅसेज पाठवले असल्याचे म्हटले जात आहे.