पाटणा : राज्यातील नितीश कुमार सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की, मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी हाणला.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मोदी यांनी बंका येथे घेतलेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच मोदींनी सभा घेतली. यावेळी मोदींनी बिहारमधील जनता दिवाळी सण साजरा करेलच पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही येथील जनता दिवाळी सणासारखाच आनंद साजरा करेल, असा विश्वास व्यक्त केला.
देशाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचे असेल तर बिहारचा विकास महत्त्वाचा आहे, याचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला. तसेच बिहारमध्ये विभाजन, जातीय राजकारण अशा असंख्य समस्या सोडविण्याऐवजी त्यांना खतपाणी घालण्याचे काम सत्ताधाऱयांकडून होत असल्याचाही आरोप मोदींनी केला. यावेळी जातीय राजकारण आणि विभाजनाला झुगारून येथील जनतेने विकासाठी मतदान करावे, असे आवाहनही मोदींनी केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.