www.24taas.com, राजकोट
गुजरातच्या आस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-यांचा राजकोटमध्येच पराभव होईल, असा घणाघात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोंदींनी काँग्रेसवर केलाय. काँग्रेस विकासाच्या मुद्यावर खोटं बोलत असून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केलाय.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी राजकोटमधल्या सभेत भाजपवर हल्लाबोल केला होता. यावर प्रत्युत्तर देत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झडू लागल्यायेत.
गुजरात विधानसभा निव़डणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात.. ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी आणि काँग्रेससाठी अग्निपरीक्षा आहे.. विशेष म्हणजे मोदींना ही निवडणूक चुटकीसरशी जिंकणं शक्य वाटत असली तरी काँग्रेससह घरातूनच होणारा विरोध आणि इतर अनेक आव्हांनांचा सामना नरेंद्र मोदींना करावा लागणार आहे..
गुजरात विधानसभा निवडणूक जिंकणं नरेंद्र मोदींना चुटकीसरशी खरचं शक्य आहे काय ?,
गुजरातमध्ये काँग्रेस खरचं इतकी कमकुवत आहे काय ?
मोदींच्या प्रतिमेपुढे काँग्रेसचा टिकाव लागणं अशक्य आहे ?
असा विचार करणारे किंवा अशा भ्रमात राहणारे अज्ञानी ठरु शकतात. काँग्रेसच्या आव्हानाबरोबरच मोदींना घरातून म्हणजेच भाजपातून होत असेलल्या विरोधाच्या आघाडीवरही लढावं लागणार आहे.
मोदींचे महाभारत
1) यातलं पहिलं कारण आहे भाजपचे दिग्गज नेते केशुभाई पटेल, केशूभाईंनी मोदींच्या विरोधात दंड थोपटत स्वतचा वेगळा पक्ष स्थापन केलाय. केशभाई पटेल समाजाचे आहेत. आणि पटेल समाजाची लोकसंख्या गुजरातमध्ये 21 टक्के आहे. गुजरातच्या 182 जागांपैकी 62 जागांवर पटेल मतदारांचा दबदबा आहे.
केशभाईंना शह देण्यासाठी मोदींच्या मंत्रिमंडळातही अनेकपटेल मंत्री आहेत. त्यातच पटेल समाजाचे मतदार लेऊआ आणि कडवा अशा दोन्ही गटांत विभागलेले आहेत. या विभाजनाचा फायदा मोदींना होऊ शकतो.
2) 10 वर्षांपासून अधिक गुजरातमध्ये राज्य करणा-या मोदींना अँटी इन्कबन्सी म्हणजेच सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागण्याचीही शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या पुरुषोत्तम सोलंकी आणि दिलीप साघनी या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने आत्तापासूनच रण पेटवण्यास सुरुवात केलीय. दोन्हीही मंत्र्यांवर गैरव्यवहारांचे आरोप आहेत.
3) तर गुजरात दंगलीशी काही प्रकरणांतही मोदी सरकारला झटका दिलाय. अमित शाह यांचं प्रकरण ताज उदाहरण आहे. अमित शाह यांचा जामीन सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला असला, तरी या प्रकरणाची सुनावणी आता मुंबई हायकोर्टात होणार आहे. नरोडा पाटिया प्रकरणातही मोदी सरकारमध्ये मंत्रीपद भूषविलेल्या माया कोडनानींना दोषी ठरवलय. तर यासह मेहसाना आणि ओड हिंसा प्रकरणांतही न्यायालयांच्या निर्णयानं मोदी सरकारच्या अडचणीत भर पडलीय.
4) मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांवर मोदींच्या विकासाचा चांगला परिणाम असल्याचं सांगण्यात येत. त्यासाठी भाजप सत्तेत असलेल्या महापालिकांची आकडेवारीही देण्यात येते. गुजरातमधल्या 8 महापालिकांपैकी 6 पालिका भआजपच्या ताब्यात आहेत. तर 28 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा दबदबा आहे. मात्र गुजरातच्या गावांमध्ये आजही काँग्रेसची चांगली पकड आहे. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसने गावांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केलीय. जनाधार वाढवण्यासाठी छोट्या छोट्या सभांचं आयोजन करण्यात येतय. 2009च्या लोकसभा निवडणुकांत याचा फायदा झाल्याचंही दिसून आलय. 26 लोकसभा मतदारसंघांपैकी 11 जागा काँग्रेसनं आपल्या खिशात घातल्यात.
5) थोडक्यात मोदींचे महाभारत मुंबई आणि दिल्लीतून पाहताना जितकं सहज आणि सोपं वाटतय, तितकं ते अहमादाबादहून पाहताना सोपं नाहीये..