मुंबई: दिल्ली निवडणुकांच्या निकालांनी सट्टाबाजारही हादरला. 'आप'च्या ऐतिहासिक यशामुळं सट्टे बाजारात कहीं खुशी कहीं गम असं वातावरण पसरलंय.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी तमाम राजकीय पंडिताना आश्चर्याचा धक्का दिलाय. निवडणुकांची धामधूम आणि सट्टेबाजीच्या खेळात हा निकाल सगळ्यात मोठा उलटफेर ठरलाय. निकालाच्या पूर्वसंध्येला आप आणि अरविंद केजरीवाल दिल्लीत चमत्कार घडवणार हे कळून चुकलं होतं. मात्र निकालाआधी आपवर ४५ पैसे, भाजपवर १.६० पैसे, तर काँग्रेसवर पाच रुपये असा भाव सट्टाबाजारात होता.
ज्याचा भाव कमी तितकं त्याच्या जिंकण्याच्या संधी जास्त हा सट्टाबाजाराचा नियमच... त्यामुळं आपला घवघवीत यश मिळणार हे नक्की होतं. जास्त भाव असणाऱ्या पक्षांवर पैसा लावून जास्त कमावण्याची संधी सट्टा लावणाऱ्या पंटर्सना होती. या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था बिकट होणार हेही त्यांना माहित होतं. मात्र निकालात भाजपची नौका अशाप्रकारे डुबेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवर १० फेब्रुवारीपर्यंत ५ हज़ार कोटींचा सट्टा लागला. त्यापैकी १० टक्के लोकांनी म्हणजेच ५०० कोटी सट्टा आपवर लागला. त्याबदल्यात बुकींनी पंटर्सना ४५ पैसे भावानुसार ७२५ कोटी परत केले. तर उरलेले ४२७५ कोटी रुपयाचा बुकींना नफा झालाय.
अखेर दिल्लीकरांचा कौल पाहता आपवर सट्टा लावणाऱ्या १० टक्के लोकांची चांदी झालीय. मात्र भाजपवर सट्टा लावणारे ९० टक्के पुरते बुडालेत. भारत पाकिस्तान मॅचमधूनही बुकींना इतका फायदा झाला नव्हता जितका आपच्या विजयामुळे झाला. त्यामुळं आपसह ते सुद्धा हा विजय सेलिब्रेट करतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.