www.24taas.com, बिहार
बिहारच्या मुस्लिम बहुसंख्य भागातील किशनगंज जिल्ह्यातील सुंदरबाडी या गावातील पंचायतीनं मुलींनी फोन न वापरण्याचं फर्मान सोडलंय. तर, विवाहित महिलांच्या मोबाईल वापरावरदेखील बंदी घालण्यात आलीय. विवाहित महिलांना फोनवर बोलायचं असल्यास घरातच बोलावं, असे आदेश या पंचायतीनं दिलेत.
पंचायतीचे आदेश धुडकावल्यास या महिलांकडून आणि मुलींकडून आर्थिक वसुलीही केली जाणार आहे. मोबाईलवर बोलताना तरुणी आढळली तर तिच्याकडून १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. इतकंच नाही तर मुलींना मोबाईल हाताळायचीही परवानगी नाकारण्यात आलीय. विवाहित महिला मोबाईलवर बोलताना सापडली तर २ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असं रविवारी झालेल्या बैठकीनंतर या पंचायतीनं जाहीर केलंय. या आदेशांच्या अंमलबाजवणीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सामाजिक उपदेश समिती’ नावाच्या समितीचीही स्थापना करण्यात आलीय.
मोबाईल वापरामुळे मुली स्वच्छंद होतात, खास करून कॉलेज तरुणी मोबाईलच्या प्रभावाखाली जास्त येतात, . त्यातून तरुण-तरुणींची प्रेमप्रकरणे आणि पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यामुळे समाजावर विपरीत परिणाम होत आहेत, त्याला पायबंद घालण्यासाठी महिलांना ‘मोबाईल बंदी’ करण्यात आली, असं कारण पंचायतीनं दिलंय.