आपापल्या पक्षात घुसमटणाऱ्यांना `आप`चा रस्ता मोकळा - केजरीवाल

दिल्लीत सरकार स्थापनेवरून अजूनही गोंधळचाच वातावरण कायम आहे. याच दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एका वक्तव्यानं हे वातावरण आणखीन गरम केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2013, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सरकार स्थापनेवरून अजूनही गोंधळचाच वातावरण कायम आहे. याच दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एका वक्तव्यानं हे वातावरण आणखीन गरम केलंय. ‘आपापल्या पक्षात घुसमटणाऱ्या नेत्यांनी आपल्या पक्षाशी विद्रोह करत ‘आप’मध्ये सामील व्हावं’ असं आवाहनच केजरीवाल यांनी केलंय.
बदलती राजकीय समीकरण, घटनाक्रम आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांचं हे वक्तव्य खूप महत्त्वाचं मानलं जातंय. केजरीवाल यांनी इतर पक्षांच्या नेत्यांना आवाहन केलंय. यावेळी, त्यांनी आपल्या पक्षात घुसमटणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षाला धडा शिकवण्याचं आवाहन केलंय. आपल्या पक्षासोबत विद्रोह करून अशा नेत्यांनी ‘आप’चं समर्थन करावं, असं केजरीवाल यांनी म्हटलंय.
‘आप’ लोकसभा निवडणुका लढणार का? असा प्रश्न केजरीवाल यांना विचारला असता, ‘लोकसभा निवडणुका कधी आणि कशा लढाव्यात, यावर नंतर चर्चा केली जाईल... सध्या तरी समोर असलेल्या प्रश्नांवर उत्तरं शोधायची आहेत’ असं उत्तर दिलं.
केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना, दिल्लीत सरकार बनविण्यासाठी ‘आप’ ना कोणत्या पक्षाला समर्थन देणार आणि ना कोणत्या पक्षाचं समर्थन घेणार, असं स्पष्ट केलंय. ‘दिल्लीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावं... यासाठी भाजपानं पुढाकार घ्यावा’ असा सल्लाही यावेळी केजरीवाल यांनी दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.