ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!

गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 23, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली/मुंबई/नाशिक
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच सरकार कांदा आयत करण्याचा विचार करत असल्याची माहितीही पवारांनी दिलीय. परतीच्या पावसामुळं देशातल्या कांद्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं देशातच कांद्याला अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळं निर्यातीचा प्रश्नच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
एकीकडे राज्यात ऑक्टोबर हीटच्या झळांमुळे घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे कांद्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागतेय. देशातील बहुतेक शहरात कांद्याचे भाव १०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना महागाईला तोंड द्यावं लागतंय. देशभरात वाढलेल्या कांद्याच्या दरांमुळे राज्यातही सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागतेय. कांद्याचे वाढते दर अक्षरश: नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेत.
मुंबईत नव्या कांदा प्रति किलो ७० रुपयाच्या घरात विकला जातोय. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचा होलसेल भाव ४५ ते ५५ रूपये इतका आहे... तर रिटेल भाव ७० रुपये आहे. लासलगावात ५९५२ रुपये प्रति क्विंटल विकला जातोय... तर सटाण्यामध्ये ६५०० रुपये प्रति क्विंटल विकला जातोय. राजधानी दिल्लीमध्येही कांद्याचे दर शंभराच्या घरात पोहोचलेले दिसत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.