हैदराबाद : टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला नुकतंच तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय... पण, यामुळे आणखी एक नवा वाद उभा राहिलाय.
तेलंगनाचे भाजप नेते लक्ष्मणं यांनी बुधवारी सानिया मिर्झा हिला ‘पाकिस्तानची सून’ म्हणून हिणवलंय. लक्ष्मण यांनी तेलंगनाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही सानियाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
आंध्रप्रदेशच्या विघटनानंतर तेलंगना राज्याला स्वतंत्र ओळख मिळालीय. स्वतंत्र तेलंगनाच्या सरकारनं सानियाला राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलंय. भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, सानिया मिर्झा मुळची महाराष्ट्राची रहिवासी आहे. नंतर ती हैदराबादमध्ये स्थानांतरीत झाली होती. त्यामुळे, तीही परकीय आहे. लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, स्वतंत्र तेलंगना राज्याच्या मागणीला झालेल्या आंदोलनातही सानिया कधी दिसली नव्हती. सानिया मिर्झानं पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह केल्यानं ती ‘पाकिस्तानची बहू’ आहे, असं लक्ष्मण यांनी म्हटलंय.
लक्ष्मण तेलंगना विधानसभेतील भाजपचे नेते आहेत. सरकारची नजर अल्पसंख्यांक मतांवर असल्यानं त्यांनी सानियाला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याचा आरोप भाजपनं केलाय.
महत्त्वाचं म्हणजे, मंगळवारी, एक करोड रुपये देऊन तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सानिया मिर्झा हिला राज्याच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्त केलं होतं. यावेळी, राव यांनी सानियाचा उल्लेख ‘हैदराबादची मुलगी’ म्हणून केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.