संयमाचा अंत पाहू नका, पाकला राष्ट्रपतींचा इशारा

पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 15, 2013, 08:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
देशाच्या ६७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर संबोधित करताना हा इशारा दिला. राष्ट्रपती मुखर्जी यांनी पाकिस्तानचा उल्लेख टाळला. अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आणि आपली प्रांतीय एकात्मता जोपासण्यासाठी आम्हीदेखील आवश्यक ती पावले उचलू शकतो, सज्जड इशारा मुखर्जी यांनी दिला.

भारताने शेजारील देशांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. परंतु शेजारील देशांनी भारताला नेहमीच धोका दिलेला आहे. आमच्या संयमाला ते कमजोरी समजले आहेत. सीमेवर सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे. नियंत्रण रेषेवर नेहमीच होत असलेल्या संघर्षविरामाच्या उल्लंघनामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. शांततेप्रति आमची वचनबद्धता कायम राहणार आहे. पण, आमच्या संयमालादेखील मर्यादा आहेत, हे कुणीही विसरू नये, असे पाकिस्तानला मुखर्जी यांनी बजावले.

देशातील भ्रष्टाचार हा अतिशय गंभीर मुद्दा बनलेला आहे. राज्यकारभार आणि घटनात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीवर देशभरातच प्रखर टीका होत आहेत. नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकीत देशात स्थिर सरकार निवडण्याची संधी आपल्याला मिळणार आहे, असे मतही राष्ट्रपतींनी व्यक्त केले.

संसद आणि विधिमंडळांमध्ये ज्या पद्धतीने कामकाज होत आहे, तोदेखील चिंतेचाच विषय आहे. या सर्व प्रकारांना जनता खरोखरच कंटाळली आहे. तसेच लोकांना न्याय मिळण्यात प्रचंड विलंब होत असल्याने त्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासही उडत आहे, अशी चिंता राष्ट्रपती मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.