www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांची वाढत्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्याचा भाजप कोणताही चान्स सोडत नाही. पुढील महिन्यात हैदराबाद येथे सभा होणार असून, सभेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी पाच रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे.
मोदींच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून, त्यांच्या सभेला गर्दी निश्चिीत होणार आहे. भाजपने हे ओळखून प्रत्येकी पाच रुपयांच्या तिकिटावर नागरिकांना प्रवेश देण्याची योजना आखली आहे. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकही पैसे मोजण्यास तयार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
येथील लाल बहादूर स्टेडिअमवर 11 ऑगस्ट रोजी मोदींची सभा होणार असून, सभेला एक लाख जण उपस्थित राहण्याची शक्यूता वर्तविण्यात येत आहे. तिकिट विक्रीमधून मिळणारी रक्कम उत्तराखंडमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनेक पक्ष रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. परंतु, नरेंद्र मोदी असे व्यक्तीमत्व आहे, की त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. उत्तराखंडमधील नागरिकांना मदत करण्यासाठी हा चांगला मार्ग असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.