कथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली

ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Updated: Aug 7, 2016, 04:28 PM IST
कथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली title=

नवी दिल्ली : ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

टाऊनहॉल मिटिंगमध्ये कथित गोरक्षकांच्या कृत्यांची मला भयंकर चीड येतेय. यातील बहुतेक जण  समाजकंटकंच आहेत! रात्री पापं करतात आणि दिवसा गोरक्षकाचं कातडं पांघरून पुण्य करण्याचं ढोंग करतात, असं मोदींनी म्हटलंय. 

इतकंच नाही तर, राज्य सरकारनं अशा लोकांना शोधून काढून त्यांचा डोजियर (रिपोर्ट) तयार करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असा सूचनाही पंतप्रधानांनी केलीय. 

व्हिडिओतून पाहा, नेमकं काय म्हटलंय पंतप्रधानांनी

ते 'हिंदू महासभे'साठी होतं?

महत्त्वाचं म्हणजे, आपल्या या भाषणात पंतप्रधानांनी कुणाचा उल्लेख मात्र केला नव्हता... तरीदेखील हिंदू महासभा मात्र भडकलीय. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. जर गो रक्षणासाठी काही घटना घडली तर लगेच हाणामारी करणाऱ्यांना तुरुंगात धाडलं जातं. परंतु, ७०-८० टक्के लोकांना अपराधी म्हणणं चुकीचं आहे. 

२०१४ च्या निवडणुकीनंतर गोहत्येवर बंदी घालण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं... परंतु, आता तर गो हत्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात. जर एकाही गोरक्षकाला अटक झाली तर आम्ही याचा विरोध करू.