जम्मू-काश्मीरमध्ये पूर परिस्थिती; मोदींनी नक्वींना घटनास्थळी धाडलं

श्रीनगर आणि दक्षिण कश्मीरच्या बहुतांशी भागात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील झेलम नदी धोक्याची पातळी गाठलीय. त्यामुळे, या भागात अलर्ट जाहीर करण्यात आला असून  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय. 

Updated: Mar 30, 2015, 12:37 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये पूर परिस्थिती; मोदींनी नक्वींना घटनास्थळी धाडलं title=

श्रीनगर : श्रीनगर आणि दक्षिण कश्मीरच्या बहुतांशी भागात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील झेलम नदी धोक्याची पातळी गाठलीय. त्यामुळे, या भागात अलर्ट जाहीर करण्यात आला असून  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये पूरपरिस्थिच्या समिक्षेसाठी मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना घटनास्थळी धाडलंय. नक्वी पूर प्रभावित भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, आज सायंकाळपर्यंत ते पंतप्रधानांना आपला रिपोर्ट सादर करतील. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी विधानसभेत सरकार पूरस्थितीवर गंभीर असल्याचं म्हटलंय. 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही या भागात पूरानं थैमान घातलं होतं, तीच परिस्थिती पुन्हा उद्भवून नये, अशी मी प्रार्थना करतोय, असं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. 

काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या भुस्खलनात ४४ बांधकामं जमीनदोस्त झालीत. त्यात १८ घरांचा समावेश आहे..सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाल्याचं वृत्त नाहीय. 

या मुसळधार पावसाचा श्रीनगर-जम्मू महामार्गावरील वाहतूकीवरही परिणाम झालाय. राज्य सरकारनं या परिसरात पूर घोषित केलाय. चार एप्रिलपर्यंत जम्मू काश्मीर आणि परिसरात पाऊस सुरु राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफ आणि बचाव पथक या भागात पोहचलेत. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.