विवाहापूर्वी 'सेक्स' अनैतिक, प्रत्येक धर्माला अमान्यच - कोर्ट

विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 6, 2014, 08:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय. विवाह करण्याचं दिलेल्या वचनाच्या आधारावर दोन वयस्कर व्यक्तींमध्ये निर्माण झालेला प्रत्येक लैंगिक संबंध हा बलात्कार ठरत नाही. ‘एखादी महिला विशेषत: वयस्कर, शिक्षित आणि व्यवसाय-नोकरी करणारी महिला, केवाळ विवाहाच्या आश्वासनावर एखाद्या पुरुषाशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल तर असं ती केवळ आपल्या जोखमेवर करत असते’ असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश विरेंद्र भट यांनी म्हटलंय.
‘माझ्या मते, केवळ विवाहाच्या आश्वासनावर दोन वयस्कर व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध निर्माण झाला... आणि काही कारणास्तव पुरुष हे आश्वासन पूर्ण करू शकला नाही तर असा प्रत्येक लैंगिक संबंध हा गुन्हा ठरू शकत नाही... जेव्हा एखादी वयस्कर, शिक्षित आणि नोकरी करणारी महिला विवाहाच्या आश्वासनावर स्वत:ला आपल्या मित्राच्या किंवा सहकार्यांच्या स्वाधीन करून लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल तर ती असं केवळ स्वत:च्या जोखमेवर करत असते. तिला आपल्या या कृत्याबद्दल समजायला हवं आणि हेही जाणून घ्यायला हवं की पुरुषाकडून त्यानं दिलेली आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता आहे किंवा नाही’ असं न्यायालयानं यावेळी म्हटलंय. ‘यावेळी ती लैंगिक संबंध प्रस्थापित करूही शकते किंवा नाही. तिला हे समजायला हवं की ती एखाद्या अशा गुन्ह्यात सहभागी होतेय जे केवळ अनैतिक नाही तर जगातील प्रत्येक धर्माच्या विरुद्ध आहे. जगातील कोणताही धर्म विवाहापूर्वी लैंगिक संबंधांना परवानगी देत नाही’ असंही यावेळी न्यायालयानं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.