www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे. दोषी गुन्हेगार आमदार-खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम आणि त्यावर राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य या संदर्भात नुकतीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल २५ मिनिटे ही बैठक सुरू होती.
‘दोषी गुन्हेगार आमदार-खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम निव्वळ बावळटपणा आहे. हा वटहुकूम फाडून फेकून दिला पाहिजे’ अशा शब्दांत राहुल गांधींनी वाभाडे काढले होते. राहुल गांधींनी हे विधान का केलं, यासंदर्भात राहुलशी चर्चा करीन, असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचसंदर्भात दोघांचीही ही चर्चा होतेय.
वटहुकूमाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांना बळ तेव्हा मिळालं जेव्हा गांधी जयंतीनिमित्त आज यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग राजघाटावर गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाले पण राहुल गांधी मात्र यावेळी अनुपस्थित राहिले.
या भेटीनंतर आज सायंकाळी काँग्रेस कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. तसंच या अध्यादेशावर आज संध्याकाळी कॅबिनेट बैठक होणार आहे. यानंतर पंतप्रधान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये यावर पुन्हा एकदा विचार-विनिमय होईल. कायदामंत्री कपिल सिब्बल कॅबिनेटमध्ये वटहुकूम परत घेण्यासाठी नोट सादर करू शकतात. या नोटमध्ये राष्ट्रपतींनी अध्यादेशाच्या प्रस्तावाला माघारी पाठवावं, असं नमूद करण्यात आलंय. त्यामुळेच त्याआधी आता होणाऱ्या पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्या भेटीकडे लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.