नवी दिल्ली : देशातील अनेक मोठ्या विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबधित एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सीआयएसएफचे डीजी आणि एयरपोर्टच्या सुरक्षेशी संबंधित इतर मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल यांनी दिलेल्या गुप्तचर संघटनेच्या रिपोर्टमध्ये एयरपोर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहशतवादी संघटना ड्रोनच्या माध्यमातून एयरपोर्टला लक्ष्य करु शकतात. एयरपोर्टच्या मुख्य बाजूंवर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यता अधिक आहे.
एयरपोर्टच्या सुरक्षेसंदर्भात एयरपोर्टच्या बाजुला असलेल्या झोपडपट्ट्या आणि हॉटेल या चिंतेचा विषय आहेत. 98 पैकी 26 एयरपोर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
भारताने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. यासंबंधितच एक बैठक आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावली आहे.