नवी दिल्ली : अहमदनगर येथील शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू झालेल्या वादात आता द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी उडी घेतलेय. शनी हा देव नाही, तो एक ग्रह आहे, असे विधान केलेय.
महिलांना सामाजिक न्याय मिळायला हवा, परंतु धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रथा परंपरांचा विचार व्हायला हवा, असे म्हणत शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता अधिक आहे.
शनी हा काही देव नाही, तो एक ग्रह आहे. त्याची पूजा करण्याऐवजी त्याला पळवून लावले पाहिजे, असे बेधडक व्यक्तव्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे. या मुद्यावर अनेक मान्यवरांचे एकमत होत असताना, महिलांच्या समान अधिकारांच्या बाजुने सगळे एकत्र होत असताना शंकराचार्यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिलांना समान वागणूक मिळायला हवी आणि त्यादृष्टीने धार्मिक नेत्यांनी पावले उचलायला हवी असे सांगत महिलांच्या बाजूने आपले मत व्यक्त केलेय.