नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. ही भेट तब्बल ४५ मिनिटांची होती. मात्र भेटीचे कारण अस्पष्ट राहिले. दरम्यान, नोटबंदीबाबत सामान्यांना त्रास होत असल्याने याचा विचार करावा, याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
गेल्या महिन्यात राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांची आज प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी देशातील सद्य स्थितीवर दोघांचे बोलणे झाले. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर येथे भेट झाली. तेथे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली होती.
उद्धव ठाकरे उद्या केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेणार आहे. या बैठकीत नोटबंदीमुळे उद्भवलेल्या आर्थिक आणीबाणीवर करणार चर्चा आहेत. दुपारी ३:३० वाजता अरुण जेटली यांच्या निवासस्थानी चहापान कार्यक्रमच्यावेळी ही चर्चा होणार आहे. दरम्यान, त्याआधी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक नवी दिल्लीत झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत ही बैठक झाली. नवी दिल्ली येथील शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.