निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल

 साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Updated: May 5, 2017, 08:22 AM IST
निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल title=

नवी दिल्ली : साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

27 मार्च रोजी अपीलावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती, आणि अशोक भूषण याचं खंडपीठ त्यावर अंतिम निकाल देईल.  23 वर्षाच्या निर्भयावर 16 डिसेंबर 2012 रोजी निर्घृण बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं. त्यानंतर 29 डिसेंबरला सिंगापूरच्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एकानं तुरूंगात आत्महत्या केली. सत्र न्यायालयानं चारही आरोपींनी फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींनी केलेलं कृत्य अमानवीय असल्याचं सांगून फाशीची शिक्षा कायम ठेवली.

दरम्यान उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरोपींचं वय आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, फाशीची शिक्षा कमी करावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ज्येष्ठ विधीज्ञ संजय हेगडे, राजू रामचंद्रन या दोघांना कोर्टाचे मदतनीस नेमलं. या दोघांनीही वेगवेगळी कारणं देऊन चौघा आरोपींनी देण्यात आलेली फाशीची शिक्षा कायद्याला धरून नसल्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आज खंडपीठ नेमका काय निर्णय घेतय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.