मुंबई : दिल्लीहून निघालेल्या टॅल्गो ट्रेननं 12 तासांहूनही कमी वेळात मुंबई गाठली, आणि या ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली. ताशी 150 किलोमीटरच्या वेगानं शनिवारी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी दिल्लीहून टॅल्गो निघाली होती. मात्र वेळेआधीच म्हणजे सुमारे पाऊणे बारा तासातच टॅल्गोनं हे अंतर पार केलं.
मुंबई सेंट्रल स्टेशनवर ही ट्रेन रात्री 2 वाजून 32 मिनिटांनी पोहचली. अंतिम चाचणीवेळी 9 डब्यांची ही ट्रेन 11 तास 48 मिनिटांतच मुंबईत पोहचली. दिल्ली मुंबई मार्गावर या ट्रेनची सहा वेळा चाचणी करण्यात आली.
गेल्या बुधवारच्या चाचणीवेळी ट्रेन 18 मिनिटं उशिरानं पोहचली. दिल्ली मुंबई दरम्यान 1384 किमी अंतर चार तासांनी कमी करणं हाच या ट्रेनचा उद्देश आहे. मुंबई दिल्ली प्रवास राजधानी एक्सप्रेस 16 तासांत पूर्ण करते. पण आता टॅल्गो ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.