नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये राहणारी शुमायना ही राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू तीन तलाखची बळी ठरली आहे. या खेळाडूला तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन तलाख दिला आहे. अमरोहा शहरातील मुहल्ला पीरजादामधील जावेद इकबाल यांची ती मुलगी आहे. शुमायनाने नेटबॉलमध्ये सात वेळा नॅशनल आणि चार वेळा ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ती एक चांगली खेळाडू असल्याने तीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
हुंडा न दिल्याने तिच्या पतीने तलाख दिल्याचा तिचा आरोप आहे. तिला एक मुलगी आहे. शुमायनाच्या वाढदिवसादिवशी नवऱ्याने दुबईहुन तिला व्हॉट्सअॅपवरुन तलाख दिला. सध्या ती आपल्या लहान मुलीला घेऊन न्यायाचे दरवाजे ठोठावत आहे.
शुमायनाचा विवाह ९ फेब्रुवारी २०१४ मध्ये लखनऊमधील गोसाईगंजच्या मोहनलालगंजमध्ये राहणाऱ्या फारुख अली यांचा मुलगा आजम अब्बासीसोबत झाला होता. लग्नानंतर तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली होती. त्यामध्ये त्यांनी तिला जाळण्याचाही प्रयत्न केला होता, असे तिचे म्हणणे आहे. तसेच गर्भवती असताना सासरच्या लोकांनी जबरदस्ती लिंग तपासणी करून घेतली. त्यामध्ये मुलगी असल्याचे कळाल्याने त्यांनी मारहाण केली आणि नंतर माहेरी पाठवून दिले.
२५ एप्रिल २०१५ ला तिने सासरच्या लोकांवर हुंड्या विरुद्ध गुन्हा दाखल केला म्हणून नवऱ्याने तलाख दिला असेही ती म्हणाली. तसेच तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मदतीचे पत्र लिहिले आहे. ती म्हणते की, की, योगींकडून मला न्याय मिळेल अशी आशा आहे.