नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये उद्या विश्वासदर्शक ठराव भाजपकडून मांडण्यात येणार आहे. मात्र, भाजपकडे बहुमत नसताना सरकार स्थापन्याचा दावा केला आहे. काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा भाजप घेईल, असे संकेत भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिले आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आम्ही स्वागत करु, असे ते यावेळी म्हणालेत.
भाजप-शिवसेना यांच्यातील युतीबाबतची बोलणी फिस्कटल्याने भाजपच्या अडचणी अधिकच वाढलेल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीने निकाल स्पष्ट झाल्याच्या दिवशी भाजपला स्थिर सरकारसाठी पाठिंबा देऊ केला. त्याचा पुनरुच्चारही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तर दोन दिवसांपूर्वी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे १२२ आमदारांच्या जोरावर भाजप उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे.
राज्याच्या विकासाकरिता सरकारस्थापनेसाठी कॉंग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा चालेल, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. राज्याच्या दारुण अवस्थेस जबाबदार असलेल्या कॉंग्रेसशिवाय इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याचे स्वागतच असल्याचे ज्येष्ठ भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी आज सांगितले. राज्याच्या विकासाकरिता व जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा पाठिंबा स्वीकारला जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली आहे, असे ते म्हणालेत.
रुडी यांच्या नव्या विधानामुळे वेळ पडल्यास भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाही स्वीकारेल हे आता स्पष्ट झाल्यात जमा आहे. दरम्यान, शिवसेनेसंदर्भात बोलताना रुडी यांनी निवडणुकीआधी व निवडणुकीनंतरही शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याची भाजपला इच्छा होती, असे सावध विधान केले.
भाजप सरकारला अजूनही शिवसेनेना पाठिंबा देईल, अशी आशा रुडी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या विकासाकरिता येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे, शिवसेनाही आमच्याबरोबर येईल, अशी मला आशा आहे, असे रुडी म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.