राष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय?

राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

Updated: Apr 27, 2017, 09:04 PM IST
राष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय? title=

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याआधी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपतीपदासाठी दिल्लीमध्ये घडामोडी घडत असतानाच शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. भाजपकडून सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, नजमा हेप्तुल्ला आणि वैंकय्या नायडू यांच्या नावाची चर्चा आहे.

या नावांमधल्या सुमित्रा महाजन या मराठी आहेत तर सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी व्यक्त केली होती. यामुळे या दोघींपैकी एकीचं नाव पुढे आलं तर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

राष्ट्रपतीपदासाठी दिल्लीत शरद पवारांच्या नावाचीही चर्चा आहे. राष्ट्रपतीपदासाठी डाव्या पक्षांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याचं समजतंय. शिवाय जेडीयूनं देखील पवारांच्याच पारड्यात वजन टाकल्याचं समजतंय.  मराठी माणूस म्हणून शिवसेनाही पवारांना पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे.

या सगळ्या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसनं मात्र जर पुन्हा एकदा प्रणब मुखर्जींच्या नावाला पसंती दिली तर शिवसेना मागच्याच वेळेप्रमाणे यंदाही प्रणबदांना पाठिंबा देणार का हा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी प्रणब मुखर्जी मुंबईत आले असताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी त्यांची भेटही घेतली होती.

दिल्लीमध्ये या घडामोडी घडत असतानाच सुमित्रा महाजन किंवा सुषमा स्वराज विरुद्ध शरद पवार विरुद्ध प्रणब मुखर्जी यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली तर मात्र शिवसेनेची गोची व्हायची शक्यता आहे.