www.24taas.com, नवी दिल्ली
एकीकडे काँग्रेसनं राहुल गांधींना उपाध्यक्षपदी बसवून पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची सूत्रं अप्रत्यक्षरित्या बहाल केली आहेत. त्यामुळे आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये निवडणुकीची धुरा कोणाकडे असणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी वादात अड़कलेले नितीन गडकरी यांना पुन्हा अध्यक्षपद मिळणार की भाजपला पर्याय काढावा लागणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाचा वाद शिगेला पोचला होता. यामुळे त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते का हा प्रश्न पक्षात आणि बाहेर विचारला जात होता. या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खंबीरपणे गडकरींच्या पाठीशी उभा होता. २००९ मध्ये गडकरींकडे पक्षाची धुरा आली, ती भाजपचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठीच. `पार्टी विथ डीफरंस` असं बिरूद मिरवणा-या भाजपाची फाईव्ह स्टार संस्कृती संघाला मोडायची होती. हा पक्ष आंदोलन करणंच विसरला होता. संघानं गडकरींच्या आडून भाजपवर आपली पकड पुन्हा मजबूत केली.
गडकरींनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्ष किती आक्रमक झाला, हा वादाचा मुद्दा ठरू शकेल, पण भाजपचा कॉर्पोरेट चेहरा बदलण्यात गडकरींना यश आलंय, हे मान्यच करावं लागेल. अनेक राज्यात संघटना मजबूत झाल्याचं चित्र आहे. उमा भारती, जसवंत सिंह यांच्यासारखे काही नाराज नेते स्वगृही आले. तरी उत्तरप्रदेशमध्ये आलेलं अपयश, कर्नाटकचा राजकीय पेच आणि अगदी अलीकडे हिमाचल प्रदेशातलं सत्तांतर, झारखंडची सत्ता जाणं या काही घटना गडकरींच्या विरोधात जाणा-या आहेत... पुढल्या वर्षीच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी असावेत, असा एक मतप्रवाह संघ आणि भाजपत आहे. या निर्णयावर पक्षाध्यक्षाचा प्रभाव असणारच आहे. त्यामुळे तिथं गडकरी असणार की दुसरं कोणी, यावर निर्णय अवलंबून राहील. अर्थात, मोदींचं नाव संघातर्फेच पुढे सरकवलं जाण्याचीही शक्यता आहे.
एप्रिल 2014 मध्ये लोकसभा निवडणुक होणार आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षांना चमत्कार करायला जेमतेम एक वर्ष मिळणार आहे. रात्रं थोडी आणि सोंगं फार, अशी स्थिती होऊ द्यायची नसेल, तर संघ आणि भाजपला निवडणुकीची धुरा कोणाकडे असणार, याचा निर्णय लवकराल लवकर घ्यावा लागेल.