www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने आपल्या वेबसाईटमध्ये आता भारताचा नवा नकाशा टाकला आहे. याआधी बनवलेला गेलेला भारताचा नकाशा चुकीचा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. भारताने त्यावेळी जोरदार विरोध केला होता.
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते व्हिक्टोरिया नुलँड यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत म्हटले की आमच्याकडून चूक झाली होती पण आम्ही त्यात सुधारणा केली आहे. आता अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या आणि इतर वेबसाईटवर आता भारताचा योग्य नकाशा टाकण्यात आला आहे.
वेबसाईटवर आधी झळकलेल्या नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. यावर भारताने आक्षेप घेतल्यानंतर विदेश मंत्रालयाने हा नकाशा काढून टाकला. भारताने असं सांगितलं आहे की संपूर्ण जम्मू काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग आहे.
नूलँड म्हणाले की काश्मीरप्रती आमचा स्वतःचा कुठलाही खास दृष्टीकोन नाही आणि काश्मीरप्रश्नी सर्वांनी शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा. वेबसाईटवर आता योग्य नकाशा टाकल्यावर आम्हाला समाधान वाटत आहे.