लग्न लावून चार वर्षीय चिमुरडीला दिली शिक्षा

विवाह म्हणजे नेमकं काय हेही समजत नसलेल्या चार वर्षांच्या या मुलीचा विवाह सात वर्षीय मुलाशी लावण्यात आल्यानं मुलीच्या आईला चांगलाच धक्का बसला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 4, 2013, 05:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाकिस्तान
पाकिस्तानात एका चार वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांच्या कृत्याची शिक्षा दिली गेलीय. विवाह म्हणजे नेमकं काय हेही समजत नसलेल्या या चार वर्षांच्या या मुलीचा विवाह सात वर्षीय मुलाशी लावण्यात आल्यानं मुलीच्या आईला चांगलाच धक्का बसला.
मुलीच्या आईनं याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय. मंदिराच्या पुजाऱ्यासहित इतर आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. परंतू, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील हकरा मोडी निवासी एका श्रीराम कोहली नावाच्या एका हिंदू मुलानं संगीता नावाच्या मुलीबरोबर फरार झालाय. श्रीराम हा विवाहित असून त्याची चार वर्षांची मुलगीदेखील आहेत. फरार झालेल्या प्रेमी जोडप्याची खबर गावकऱ्यांपर्यंत पोहचल्यानंतर संगीताच्या परिवारातील लूंड जातीतील लोकांनी हिंदू समूदायाविरुद्ध जिरगा (इस्लामी पंचायत) आयोजित केलाय. यामध्ये श्रीरामच्या कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीनं बोलावण्यात आलं.

लूंड जातीतील लोकांना श्रीरामच्या कृत्याचा बदला म्हणून त्याच्या चार वर्षांच्या मुलीला शिक्षा देण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी चार वर्षीय मीनाचा विवाह श्रीरामची प्रेयसी संगीता हिच्या सात वर्षीय भावाशी लावण्यात यावा, असा फर्मानच काढला. पंचायत संपल्यानंतर लगेचच त्यांनी जबरदस्तीनं मीनाचा विवाह लावून दिला. मीनाच्या आईनं आणि आजीनं याचा विरोधही केला. परंतू, त्यांचा विरोध कामी आला नाही. उलट, या निर्णयाविरोधात जाणाऱ्या पक्षानं दुसऱ्या पक्षाला दोन लाखांची भरपाई देण्याचा आणखी एक निर्णय सुनावण्यात आला.