www.24taas.com, पीटीआय, क्वालालांपूर
ऑस्ट्रेलियाच्या सागरी मोहिम कंपनीनं बंगालच्या उपसागरात बेपत्ता मलेशिया विमानाचा मलबा सापडल्याचा दावा केलाय. ही जागा सध्या हिंदी महासागरात सुरू असलेल्या तपासापासून ५,००० किलोमीटर दूर आहे.
एका मलेशियन वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार एडीलेडमधील जियोरेजोनेंसनं काल सांगितलं की, त्यांनी १० मार्च पासून एमएच ३७० या बेपत्ता विमानाचा तपास घेण्याच स्वत:हूनच सुरुवात केली होती आणि आता सद्य जागेपासून पाच हजार किलोमीटर दूर बंगालच्या खाडीत विमानाचा मलबा सापडलाय.
कंपनीचे प्रवक्ता डेव्हिड पोपनं सांगितलं की जियोरेजोनंसनं संभावित अपघात क्षेत्रातील २०,००,००० स्क्वेअर किलोमीटर भागात तपास केला. त्यासोबतच उपग्रह आणि विमानांकडून मिळालेल्या फोटोंचाही वापर केला जातोय आणि कंपनीचे संशोधक विमानाचं अखेरचं ठिकाण उत्तरेला शोधण्याचं काम करतायेत. यासाठी संशोधक २० हून अधिक तांत्रिक पद्धतींचा वापर करत आहेत.
कंपनीनं दावा केलाय की बेपत्ता विमान शोधण्यासाठी ते ज्या तंत्राचा वापर करत आहेत ते तंत्र आण्विक शस्त्रे आणि पानबुड्यांचा शोध घेण्यासाठी वापरलं जातं. पोपनं सांगितलं की जियोरेजोनेंसनं विमान बेपत्ता होण्याच्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ५ मार्चला घेतलेले फोटो आणि आताचे फोटो याची तुलना करत आहेत. त्यांनी सांगितलं की एमएच ३७० विमान बेपत्ता होण्यापूर्वी हा मलबा तिथं नव्हता. त्यामुळं हा मलबा बेपत्ता मलेशिया विमानाचाच असण्याची शक्यता आहे. कंपनी असंही म्हणते, हा मलबा तोच असं आम्ही नाही म्हणत मात्र त्याबद्दल्याच्या पुराव्यांचा तपास करून हे पुढं येईलच.
मलेशियाचं एमएच ३७० हे विमान ८ मार्चपासून बेपत्ता झालंय. पाच भारतीयांसह त्यात २३९ प्रवासी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.